छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अत्यंत कठीण, तपश्चर्येने भरलेली आणि आध्यात्मिक उर्जेचा अद्भुत संगम असलेली पवित्र नर्मदा परिक्रमा पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण करून शैलेश श्यामसुंदर अग्रवाल यांनी ऐतिहासिक कार्य सिद्ध केले. सुमारे ३६०० किलोमीटरचा हा प्रदीर्घ आणि आव्हानात्मक प्रवास त्यांनी १ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू करून २६ मार्च २०२६ रोजी पूर्ण केला. केवळ ४ महिन्यांत पूर्ण करून अपार श्रद्धा, जिद्द आणि आत्मविश्वासाचे विलक्षण उदाहरण घालून दिले आहे.
नर्मदा परिक्रमा ही भारतातील सर्वात पवित्र आणि कठीण धार्मिक यात्रांपैकी एक मानली जाते. ही संपूर्ण यात्रा सुमारे ३५०० ते ३६०० किमी इतकी लांब असते. ही परिक्रमा ६ महिने ते १ वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीत पूर्ण केली जाते. यात्रेदरम्यान साधे जीवन, नियमांचे पालन, उपासना, संयम आणि पूर्ण श्रद्धा आवश्यक असते. अनेक साधू-संत आणि भक्त या यात्रेला आयुष्यभरातील एक महान तप मानतात. अशा या कठीण आणि दीर्घ परंपरेतील यात्रेला शैलेश अग्रवाल यांनी अवघ्या ४ महिन्यांत पूर्ण करून एक अद्वितीय विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र अग्रवाल समाजात प्रथमच अशी पदयात्रा इतक्या अल्प कालावधीत पूर्ण करणारे ते ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक न राहता संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद बाब ठरले आहे. या अद्वितीय कार्याच्या गौरवार्थ छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचे भव्य स्वागत श्री श्याम समितीद्वारे करण्यात आले.
या समारंभात अग्रवाल यांच्या अध्यात्मिक प्रवासाचा गौरव करण्यात आला. अग्रवाल परिवार, चापानेरवाला यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला कन्यापूजन करून महाप्रसाद यामध्ये सर्व भाविक, नातेवाईक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यांच्या या कार्यामुळे समाजात आध्यात्मिकतेची नवी प्रेरणा निर्माण झाली असून, युवकांमध्येही धर्म आणि संस्कृतीबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.












